देवरुखमध्ये ‘अष्टांग योग’ क्लासेसचा उत्साहात शुभारंभ; नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी हर्षदा यादव यांचा पुढाकार

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

देवरुख (प्रतिनिधी): बदलत्या जीवनशैलीत मानसिक आणि शारीरिक स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी योगाभ्यास ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने देवरुख येथील मातृ मंदिर संकुल परिसरातील मुक्तांगण सभागृहात ‘अष्टांग योग’ क्लासेसचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न झाला. ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, या निर्धाराने या वर्गांची सुरुवात करण्यात आली आहे.
या सोहळ्याला देवरुखमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख अतिथी म्हणून देवरुख न्यायालयातील ॲडव्होकेट मुरुडकर मॅडम व मुरुडकर सर ,गाव विकास समितीच्या महिला संघटना अध्यक्ष दीक्षा खंडागळे उपस्थित होते.त्याचबरोबर निवे ग्रामपंचायतीच्या सदस्या सेजल रसाळ, मातृ मंदिरच्या आंबेकर मॅडम, डॉ. मंगेश कांगणे, गाव विकास समितीचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष नितीन गोताड आणि सह्याद्रीनगर येथील प्रकाश रसाळ यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

योग शिक्षिका हर्षदा यादव यांचा संकल्प:
अष्टांग योगच्या संचालिका हर्षदा यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचीन योगाची पार्श्वभूमी आणि आधुनिक काळात त्याची असलेली आवश्यकता यावर विस्तृत प्रकाश टाकला. नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी या वर्गांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राहुल यादव यांनी हर्षदा यादव यांच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती देताना सांगितले की, २०१८ पासून त्यांनी योग प्रवेश, परिचय, प्रबोध, योग शिक्षक आणि एम.ए. (योगशास्त्र) तसेच भारत सरकारचे योग वेलनेस इन्स्ट्रक्टर अशा विविध पदव्या संपादन केल्या आहेत. आपल्या जन्मभूमीतील ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांनी हे केंद्र सुरू केले आहे.

यावेळी बोलताना दीक्षा खंडागळे यांनी हर्षदा यादव यांच्या सामाजिक जाणीवेचे विशेष कौतुक केले. हर्षदा यादव यांनी अनाथ मुलींना मोफत योग शिक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो अभिनंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. “ज्याप्रमाणे एक शिक्षक नवीन पिढीला घडवतो, त्याचप्रमाणे हर्षदा यादव योग शिक्षिकेच्या माध्यमातून समाजाला मानसिक आणि शारीरिक बळ देण्याचे कार्य करतील,” असा विश्वास खंडागळे यांनी व्यक्त केला.

प्रमुख अतिथी मुरुडकर यांनी देवरुखमधील विद्यार्थी, तरुण आणि वयोवृद्धांना आवाहन केले की, स्थानिक पातळीवर उपलब्ध झालेल्या या अष्टांग योग वर्गाचा उपयोग करून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राखावे.

आजच्या जीवनात योगाचे महत्त्व लक्षात घेऊन अष्टांग योग क्लासेस मध्ये शहरातील नागरिकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *