GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या मारुती बिर्जेने पटकावला ‘रत्नसिंधू केसरी’ किताब

रत्नागिरी: माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मांडवीच्या मारुती बिर्जे याने ‘रत्नसिंधू केसरी’ हा मानाचा किताब पटकावला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत मारुती बिर्जे याने चिपळूणच्या घडशी याला चितपट करत विजय मिळवला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मारुती बिर्जे याला मानाची चांदीची गदा आणि मानपट्टा देऊन गौरविण्यात आले. मांडवीच्या किनारी रंगलेला हा कुस्तीचा थरार पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती.

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पुरुष गटासोबतच महिला आणि मुलांच्या कुस्ती स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमान भारत केसरी शाश्वत मानकर, भाजप जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, राजू भाटलेकर, बाबा नाचणकर, समीर टाकळे, विनोद भुरण, शशिकांत मोदी, दादा ढेकणे, शुभम पिसे, संदीप भिसे, राहुल पवार, भाई जठार, ऐश्वर्या जठार, महेंद्र मांडवकर, अमित विलणकर, नितीन जाधव, दीपा देवळेकर, डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई पिलणकर आणि आयोजक योगेश मगदूम, शोएब खान, पिंट्या देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरीतील कुस्ती संस्कृतीला मोठे व्यासपीठ मिळाले असून, स्थानिक खेळाडूंनी आपल्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम सामन्यात मारुती बिर्जेने दाखवलेल्या चपळाईमुळे मांडवीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माघी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन चोखपणे पार पाडले.

Total Visitor Counter

3486972
Share This Article