चिपळूण: चिपळूण तालुक्यातील डिजिटल आणि प्रिंट मीडियामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांनी आपल्या न्याय हक्कासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ‘जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण’ या नव्या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक सागरचे ज्येष्ठ पत्रकार सुनील साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, कार्याध्यक्षपदी कोकण एक्सप्रेसचे संपादक सतीश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी पार पडलेल्या पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासोबतच तालुक्यात विधायक कामे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी राजेंद्रकुमार शिंदे व गजेंद्र खडपे, सचिवपदी योगेश बांडागळे तर खजिनदार म्हणून संतोष पिलके यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत, निसार शेख, दीपक शिंदे, ललेश कदम आणि ओंकार रेळेकर यांचा समावेश आहे. ही संघटना चिपळूणमधील श्रमिक पत्रकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष सुनील साळवी यांचा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना साळवी यांनी सांगितले की, जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण ही संघटना पत्रकारांना न्याय मिळवून देतानाच सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर राहील. कार्याध्यक्ष सतीश कदम यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून संघटनेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नव्या संघटनेच्या स्थापनेमुळे चिपळूणमधील पत्रकारितेच्या क्षेत्रात एकजुटीचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.






