राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरे, काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट
मुंबई (प्रतिनिधी): कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे आता बागायतदार आक्रमक झाले असून, एप्रिल महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत फेटाळून लावत, हक्काच्या नुकसानभरपाईसाठी कोकणचा शेतकरी आता मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे. या लढ्याला राजकीय बळ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
गेल्या दोन महिन्यांपासून अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेला कोकणचा बागायतदार हेक्टरी ५ लाख रुपये आंबा पिकासाठी आणि ३ लाख रुपये काजू पिकासाठी नुकसानभरपाई मिळावी, या मागणीवर ठाम आहे. मात्र, सरकारने केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप बागायतदारांकडून होत आहे. विशेष म्हणजे, अद्याप शासनाकडून नुकसानीचे पंचनामे किंवा कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत. एकीकडे कुंभमेळा आणि शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांसाठी हजारो कोटींच्या निधीची तरतूद केली जात असताना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील हवालदिल झालेला शेतकरी मात्र मदतीसाठी टाहो फोडत आहे.
सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध राजकीय भेटीगाठींनंतर सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, बळीराजाच्या या लढ्यात ते सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. या बैठकीप्रसंगी माजी आमदार बाळा माने, सुशांत नाईक, गणेश गायकर, किरण टेंभुलकर, अजय तेली यांच्यासह कोकणातील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा-काजू उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.







