GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा २४ टक्के अधिक पाऊस

Gramin Search
57 Views

रत्नागिरी:-पावसाचा चार महिन्यांचा हंगाम आटोपला असून राज्यातून मान्सूनने काढता पाय घ्यायला सुरवात केल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. यावर्षी कोकणात पावसाने समाधानकारक सातत्य ठेवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार २०० मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीपेक्षा २४ टक्के जास्त आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाचवेळा पूरस्थिती निर्माण झाली. या कालावधीत सुमारे साडेतीनशे लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करावे लागले. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनीही अनेकदा इशारा पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांवर पुराची टांगती तलवार होती. यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते.

चार महिन्यांत अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात घरे, गोठे, जनावरे, दुकाने यांच्यासह विविध सार्वजनिक मालमत्तांचे मिळून २९ कोटी ४३ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात पाऊसबळींची संख्या पाच होती. अनेक भागांत अतिजोरदार पावसाने भातशेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका जिल्ह्यातील सुमारे २२०४ शेतकऱ्यांच्या १२७ हेक्टर क्षेत्रातील खरोप लागवडीला बसला. या कालावधीत शासकीय मालमत्तांची सुमारे १२ कोटी ५६ लाखांची हानी झाली आहे. यामध्ये ६२ शाळा आणि १७ अंगणवाड्यांचा समावेश आहे. वैयक्तिक मालमत्तांमध्ये घर, गोठे, आणि पडवी आदींची १६ कोटी ३४ लाख ५६ हजारांची हानी झाली आहे. यामध्ये ९७७ घरांचा, १४२ गोठ्यांचा आणि ५३८ दुकानांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय निकषान्वये ३३६४ मि.मी. सरासरी पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाने तीन महिन्यांतच ही सरासरी गाठली. अखेरच्या महिन्यात ४२०० मि.मी.ची मजल गाठली. या कालावधीत सर्वच तालुक्यांत पावसाने शतकी मजल गाठली होती. यावर्षी सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात (४५६८ मि.मी.) झाला, तर कमी पावसाची नोंद गुहागर तालुक्यात (३४६५ मि.मी.) आहे.

Total Visitor Counter

2650869
Share This Article