कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये दारूची अवैध तस्करी; एसी कोच अटेंडंटला रत्नागिरीत अटक

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाडी क्रमांक ११००४ ‘कोकण कन्या एक्सप्रेस’मध्ये अवैध मद्यसाठ्याची तस्करी करणाऱ्या एका एसी कोच अटेंडंटला रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रंगेहाथ पकडले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ३५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि सी अँड आय विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गाड्यांची नियमित तपासणी सुरू असताना संशयावरून या अटेंडंटची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या नेल्या जाणाऱ्या दारूच्या ३५ बाटल्या आढळून आल्या.

रेल्वे कर्मचाऱ्याचाच अशा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वेचा प्रवास निर्विघ्न पार पडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, प्रवाशांनी अशा कोणत्याही प्रतिबंधित वस्तू सोबत बाळगू नयेत आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलातर्फे करण्यात आले आहे. याप्रकरणी अटेंडंटवर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *