GRAMIN SEARCH BANNER

डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्ती कामाची आमदार शेखर निकम यांच्याकडून पाहणी; 14.99 कोटींच्या कामाला गती

Gramin Varta
8 Views

चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी रु. 14 कोटी 99 लाखांचा निधी शासन स्तरावर पाठपुरावा करून आमदार शेखर निकम यांनी उपलब्ध करून दिला असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह केली.

सन 2025 पासून सुरू असलेल्या या दुरुस्ती कामाचा आढावा घेताना आमदार निकम यांनी चिपळूण जलसंधारण विभागाचे उपअभियंता सागर भराडे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, जि. प. सदस्य संजय कदम तसेच ग्रामस्थ यांच्यासमवेत कामाची स्थिती जाणून घेतली.

यावेळी उपअभियंता सागर भराडे यांनी धरणाच्या दुरुस्तीबाबत माहिती देताना सांगितले की, धरणाचे काम सध्या जलद गतीने सुरू असून मातीकाम 20 मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच गेट वॉल्व बसविण्याचे कामही मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यावर्षी साधारण 40 टक्के पाणीसाठा धरणात साठेल, अशी अपेक्षा आहे.

मागील काही वर्षांपासून धरणातील गळतीमुळे परिसरातील सुमारे 40 गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे आमदार शेखर निकम यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सन 2027 पर्यंत धरणाचे काम पूर्ण क्षमतेने पूर्ण करून परिसरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौर्‍यामुळे धरण दुरुस्तीच्या कामाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3297529
Share This Article