GRAMIN SEARCH BANNER

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतीय हवाई दलाचे जनजागृती अभियान

Gramin Varta
3 Views

देवरूख (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये दिल्लीतील भारतीय हवाई दलातर्फे “इंडक्शन पब्लिसिटी प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे कामकाज व रोजगाराच्या उपलब्ध संधींची  विद्यार्थ्यांना माहिती करून देण्याचा व विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे प्रेरित करण्याचा यामागे मुख्य उद्देश होता. याच अनुषंगाने हवाई दलाच्या अधिका-यानी फ्लाईट सिमुलेटर तसेच अन्य सलग्न साधन यंत्रांनी सुसज्य बनविलेल्या इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेइकलद्वारे (IPEV) विद्यार्थ्यांना हवाई दलाच्या  कामकाजाचे प्रात्यक्षिक दाखविले.

सुरुवातीला संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने यांच्या हस्ते कार्यक्रमाला उपस्थित भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर करण त्यागी आणि फ्लाईंग ऑफिसर सितीज सिंघ रावत या अधिकाऱ्यांचे यथोचीत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलातील प्रशिक्षण व जीवन, भारतीय हवाई दलातील संधी, फ्लाईट सिमुलेटर  याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्येही हवाई दलाबद्दल असणारे कुतूहल दिसून आले.

विद्यार्थ्यांनी यावेळी विचारलेल्या सर्व शंकांचे यावेळी उपस्थित हवाई दलाच्या अधिका-यानी निरसन केले. बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. या सत्राने विद्यार्थ्यांना हवाईदल अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि उद्देश, अभिमान आणि अतुलनीय जीवनशैली देणाऱ्या या करिअरला समजून घेण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ निर्माण केले. या उपक्रमाने तरुण आकांक्षांना आकार देण्याची आणि त्यांना ‘सर्वांपेक्षा सरस’ असलेल्या संस्थेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्याची हवाईदलाची वचनबद्धता खऱ्या अर्थाने दिसून आली.

Total Visitor Counter

3300997
Share This Article