GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी: मानवी आरोग्यास घातक असलेल्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने रत्नागिरी शहर परिसरात केलेल्या धडक कारवाईत सुमारे ११ हजार ५१८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती व्यंकटेश घरत यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार स्वप्निल नरेंद्र गावखडकर (४०, रा. तेली आळी), संजय पांडुरंग तावडे (४१, रा. शिवाजीनगर) आणि महेंद्र रघुनाथ सावंतदेसाई (५९, रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. १७ एप्रिल रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४:३० च्या दरम्यान रत्नागिरी शहरात ही कारवाई करण्यात आली. यातील आरोपींनी प्रतिबंधित अन्नपदार्थ पानमसाला आणि तंबाखू खाल्ल्याने मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम होतात, हे माहित असूनही केवळ विक्रीच्या उद्देशाने हा साठा जवळ बाळगला होता.

या कारवाईत पोलिसांनी तंबाखू आणि पानमसाल्याचे ७९ पॅकेट आणि ६४९ पाऊचेस असा एकूण ११ हजार ५१८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ५:३३ वाजता या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २२३, २६८, ३(५) सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अशा प्रकारे प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक नजर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3305801
Share This Article