संगमेश्वर/ एजाज पटेल: एकीकडे ग्रामीण भागात चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे महावितरणचा निष्काळजीपणा पराकोटीला पोहोचला आहे. संगमेश्वर तालुक्यातील मांजरे कोपरखरी परिसरात २५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्राची (डीपी) चोरी होऊन ३५ हजार रुपयांचे शासकीय नुकसान झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे; परंतु या मोठ्या धड्यानंतरही महावितरणचे अधिकारी कुंभकर्णी झोपेतून जागे झालेले नाहीत. चोरी झालेल्या जागेवर आजही दोन किमती रोहित्र जमिनीवर उघड्यावर धूळ खात बेवारस स्थितीत पडलेली आहेत, तर एक निकामी रोहित्र खांबावर तशाच अत्यंत धोकादायक स्थितीत लटकत ठेवण्यात आले आहे. गुन्हा दाखल होऊनही आजतागायत हे सरकारी साहित्य सुरक्षित ठिकाणी का हलवण्यात आले नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करत महावितरणच्या या घोर निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्वतःच्या मालमत्तेची सुरक्षा न करू शकणाऱ्या महावितरणच्या या ढिसाळ नियोजनाचा नाहक ताप आता आधीच कामाचा ताण असलेल्या पोलीस प्रशासनाला सहन करावा लागत आहे.
भौगोलिकदृष्ट्या मांजरे कोपरखरी हे गाव संगमेश्वर तालुक्यात आणि फुणगूस खाडीभागात येत असले, तरी तांत्रिकदृष्ट्या या गावाची मुख्य वीजवाहिनी रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी उपकेंद्राशी जोडलेली आहे. जाकादेवी उपकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या या भागात गेल्या दीड-दोन वर्षांपासून (२४ नोव्हेंबर २०२४ ते ४ मे २०२६) नादुरुस्त रोहित्र उघड्यावर पडले होते. जाकादेवी येथून वीजपुरवठा होणाऱ्या या शेवटच्या टोकाच्या गावाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे डोळेझाक केल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी या रोहित्रातील ३५ किलो तांब्याचे महागडे वायडिंग शिताफीने लंपास केले.
महावितरणच्या स्वतःच्या नियमानुसार, एखादे रोहित्र निकामी झाले की त्या जागी नवीन रोहित्र बसवून जुने साहित्य तात्काळ सुरक्षित गोदामात जमा करणे बंधनकारक असते; मात्र मांजरे परिसरात दीड वर्ष उलटूनही हे नियम सर्रास धाब्यावर बसवण्यात आले आहेत. यामुळे जाकादेवी अंतर्गत येणाऱ्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे या चोरट्यांना छुपे अभय तर नाही ना, असा गंभीर संशय आता नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
गुन्हा घडूनही उर्वरित किमती साहित्य तिथेच रामभरोसे टाकून देणे हे महावितरणच्या अकार्यक्षम कारभाराचे जिवंत उदाहरण आहे. स्वतःच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची साधी काळजी न घेणारे महावितरणचे अधिकारी चोरी झाल्यावर मात्र पोलिसांकडे धाव घेतात, ज्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना आता या उघड्यावरील साहित्याची रखवाली करावी लागत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या संपूर्ण संगमेश्वर आणि जाकादेवी परिसराच्या वीज वर्तुळात महावितरणच्या या उफराट्या कारभाराची जोरदार चर्चा सुरू असून, केवळ अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. इतका प्रदीर्घ काळ सरकारी मालमत्ता उघड्यावर सोडून चोरट्यांचे रस्ते मोकळे करून देणाऱ्या संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या उर्वरित साहित्याची पुन्हा चोरी झाल्यास किंवा एखादा जीवघेणा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, तसेच या शासकीय नुकसानीची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल केली जाणार का, या टोकदार प्रश्नांची उत्तरे महावितरणच्या वरिष्ठ विभागाने त्वरित द्यावीत, अन्यथा तीव्र कायदेशीर पवित्रा घेण्याचा गर्भित इशारा मांजरे परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.








