चिपळूण (प्रतिनिधी): “काँग्रेस हाय हाय”, “या काँग्रेसचं करायचं काय… खाली डोकं वर पाय” आणि “काँग्रेस की पहचान… नारी शक्ती का अपमान” अशा तीव्र घोषणांनी गुरुवारी चिपळूणचा चिंचनाका परिसर दणाणून गेला. महिला आरक्षण रद्द करण्याच्या कथित निर्णयाविरोधात काँग्रेस व अन्य मित्रपक्षांचा जाहीर निषेध करण्यासाठी नारी शक्ती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने हे भव्य जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात महिला, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महिलांना राजकारणात समान संधी आणि सन्मान मिळावा यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षातून महिला आरक्षण मिळवले आहे. मात्र, त्यावर गदा आणण्याचा प्रयत्न हा महिलांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारा असल्याची संतप्त भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. महिला आरक्षण हा केवळ कायदा नसून तो महिला सक्षमीकरणाचा आणि सामाजिक न्यायाचा भक्कम पाया आहे, तो रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचा धिक्कार असो, असा आरोप करत चिपळूणकरांनी या निर्णयाविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.
या आंदोलनात उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, सौ. सुप्रिया उतेकर, राहुल पवार, विनोद भुरण, नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेविका सौ. शितल रानडे, नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, सौ. आदिती गुडेकर, सौ. नयना पवार, नगरसेविका अंजली कदम, नगरसेवक संदीप भिसे यांच्यासह युवक शहराध्यक्ष शुभम पिसे, शहर सरचिटणीस सारिका भावे, पुनम काजारी, रुही खेडेकर, पालकर मॅडम, स्वाती देवळेकर, विभावरी जाधव, विमल लढ्ढा, पूजा कदम, प्राजक्ता टकले, प्रणिता घाडगे, नरेंद्र बेलवलकर, अमोल तटकरे, महेश दीक्षित, रोहन सकपाळ, गुलजार गोलंदाज, अभिषेक राजापूरकर, जतीन घटे, सचिन कांबळी यांसारखे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. महिलांच्या हक्कांशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. चिपळूणमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा जिल्ह्यात पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, येणाऱ्या काळात हा लढा अधिक तीव्र होण्याचे संकेत आंदोलकांनी दिले आहेत.






