राजापुर : पाचल येथे अवैध गॅस सिलेंडर आणि ग्राहक कार्डांचा साठा करणाऱ्या गॅस एजन्सी चालकावर गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

राजापूर: तालुक्यातील पाचल येथील एका गॅस सेवा केंद्रामध्ये भरारी पथकाने धाड टाकून अनधिकृतपणे साठवून ठेवलेला व्यावसायिक सिलेंडर आणि तब्बल १०९४ ग्राहक कार्ड जप्त केली आहेत. या प्रकरणी पुरवठा निरीक्षकांच्या तक्रारीवरून पाचल येथील श्री सद्गुरु गॅस सेवेचे चालक विलास भिकू कोलते यांच्या विरोधात राजापूर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूरचे तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक निलेश सतीश लाड आणि लिपिक विक्रम पाटील हे पाचल परिसरात तपासणीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी पाचल येथील विलास कोलते यांच्या ‘श्री सद्गुरु गॅस सेवा’ या एचपी गॅस एजन्सीच्या दुकानाची झडती घेतली. या तपासणी दरम्यान पथकाला दुकानामध्ये भारत गॅस कंपनीचा एक रिकामा व्यावसायिक सिलेंडर आणि विविध ग्राहकांची १०९४ गॅस कार्ड मिळून आली. या साठ्याबाबत पथकाने विचारणा केली असता, चालक कोलते यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. हे सिलेंडर आणि ग्राहक कार्ड साठेबाजीच्या उद्देशाने अनधिकृतपणे बाळगल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने सर्व साहित्य जप्त केले.

तहसीलदारांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री उशिरा राजापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली. पुरवठा निरीक्षक निलेश लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास भिकू कोलते (वय ५५, रा. रायपाटण) यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घरगुती गॅसचा अवैध वापर आणि कार्डांच्या साठेबाजीच्या या मोठ्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *