GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसीतील ‘ॲक्वा फुड्स’ कंपनीत धाडसी चोरी; १० लाखांचे परदेशी बनावटीचे मशिनरी पार्ट लंपास

Gramin Varta
185 Views

खेड: तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील मे. ॲक्वा फुड एक्झीम या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे १० लाख रुपये किमतीचे मशिनरी सुटे भाग चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, औद्योगिक क्षेत्रात या चोरीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. धिरजलाल मंटूलाल बरुई यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, ही चोरी २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२६ या कालावधीत कंपनी बंद असताना झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीतील मशिनरी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा चिपळूण यांच्याकडे तारण ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी कंपनीच्या परिसरात प्रवेश करून डॅनटेक फ्रिजींग सिस्टीम, डेन्मार्क येथून आयात केलेल्या महागड्या मशिनरींचे महत्त्वाचे भाग कोणत्यातरी हत्याराने कापून लंपास केले. यामध्ये कुकिंग, कुलिंग आणि अल्ट्राफ्लो फ्रीजिंग लाईनचे विविध कन्वेअर्स, इन्स्पेक्शन इन फीड कन्वेअर, हार्डनिंग टेम्परेचर इक्वलायझिंग कन्वेअर आणि ट्रान्सफर कर्व्हड कन्वेअर यांसारख्या तांत्रिक भागांचा समावेश आहे. तसेच कुकरसाठी वापरला जाणारा सुमारे १५ लाख रुपये मूळ किंमत असलेला प्रेशर व्हॉल्व्ह आणि ग्रँडिंग मशिन्सचे कन्वेअर्सही चोरट्यांनी पळवून नेले आहेत.

फिर्यादी धिरजलाल बरुई हे सध्या चिपळूण येथील रहिवासी असून मूळचे कोलकता येथील आहेत. चोरीला गेलेले सर्व साहित्य हे २०२१ मध्ये युरो आणि डॉलरमध्ये व्यवहार करून परदेशातून मागवण्यात आले होते, ज्याची एकूण अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. औद्योगिक वसाहतीसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर मशिनरींचे भाग कापून नेल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पोलीस आता या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3366860
Share This Article