संगमेश्वर तालुक्यात सूर्याचा आगडोंब; पारा ४० पार गेल्याने जनजीवन विस्कळीत

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

संगमेश्वर/एजाज पटेल : तालुक्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हे तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावरच निसर्गाचा हा रुद्रावतार पाहायला मिळत असून याचा थेट परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे.

कडक उन्हामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत तालुक्यातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कडक उन्हाच्या झळा नकोत म्हणून नागरिक केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडत आहेत. वाढत्या सिमेंटीकरणामुळे आणि सिमेंटच्या घरांच्या वाढत्या संख्येमुळे उष्णता अधिकच जाणवत असून रात्रीच्या वेळीही उकाड्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

रस्त्यावरून चालताना किंवा दुचाकी चालवताना स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिक विविध साधनांचा वापर करत आहेत. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल आणि कडक ऊन थेट त्वचेला लागू नये यासाठी डोक्याला व तोंडाला स्कार्फ बांधूनच नागरिक प्रवास करताना दिसत आहेत. छत्री, टोपी आणि सुती रुमालांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

बाजारपेठेवर या उष्णतेचा मोठा परिणाम झाला असून दुपारच्या वेळी ग्राहक फिरकत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे लिंबू सरबत, उसाचा रस, ताक आणि शीतपेय विक्रेत्यांकडे नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे या उन्हामुळे प्रचंड हाल होत असून कामाच्या वेळा बदलाव्या लागल्या आहेत. आरोग्य विभागाने देखील दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे आणि जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे, असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातील जनतेला केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *