GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप; १९ मे पर्यंत तेजस दादरला, तर मंगळुरू एक्सप्रेस ठाणे स्थानकातच थांबणार

Gramin Varta
24 Views

रत्नागिरी : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १६ आणि १७ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस आणि मंगळुरू-मुंबई एक्सप्रेस या गाड्यांच्या प्रवासात कपात करण्यात आली असून, आता या गाड्या १९ मे २०२६ पर्यंत सीएसएमटीऐवजी दादर आणि ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस २६ एप्रिल ते १७ मे या कालावधीत दादर स्थानकात खंडित केली जाणार आहे. म्हणजेच ही गाडी सीएसएमटीला न जाता दादरपर्यंतच धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस २६ एप्रिल ते १८ मे या कालावधीत ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दादर किंवा ठाणे स्थानकावरून पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. फलाटाच्या कामासाठी हा निर्णय पुढील २३ दिवसांसाठी वाढवण्यात आला असून, प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपले प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे. प्रवाशांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली असली, तरी प्रवाशांच्या गर्दीमुळे होणारा गोंधळ टाळणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.

Total Visitor Counter

3338709
Share This Article