रत्नागिरी: ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलिसीस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी मोठा विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील केंद्राचाही समावेश आहे.
राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेमुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून रुग्णांना त्यांच्या घराच्या जवळच निःशुल्क उपचार देण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश असून, सध्या राज्यात ९२ महाडायलिसीस केंद्रे ५५८ बेड्ससह कार्यरत आहेत. १ मे रोजी होणाऱ्या या विस्तारामुळे राज्यातील एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार असून, नव्या केंद्रांमध्ये दापोली (जि. रत्नागिरी) सोबतच मुरगुड, मूल, दारव्हा, केज, इगतपुरी, रावेर, मंगळवेढा, ढेबेवाडी, वेंगुर्ला, कुरखेडा आणि बदलापूर येथील रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
ही संपूर्ण योजना एंड-टू-एंड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, रुग्णांना ‘महाडायलिसीस’ संकेतस्थळ किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे उपचारासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञ, परिचारिका व सहाय्यक कर्मचारी नेफ्रोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून स्वच्छता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन केले जाते. विशेष म्हणजे रुग्णांना रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन्स आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला या सर्व सेवा पूर्णतः मोफत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत एचएलएल लाइफकेअर लिमिटेडमार्फत ही योजना राबवली जात असून, यामुळे खासगी उपचारांवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्याने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे.





