GRAMIN SEARCH BANNER

उष्ण व दमट हवामानाचा कोकणावर प्रभाव; शेतकऱ्यांना विशेष कृषी सल्ला जारी

Gramin Varta
9 Views

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर वाढत चाललेल्या उष्ण व दमट हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारतीय हवामान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. ४ मे ते ८ मे या कालावधीत रत्नागिरी, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी उष्ण व दमट वातावरण तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

या बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू, चिकू, नारळ आणि सुपारी यांसारख्या प्रमुख पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असून विशेषतः आंबा आणि काजू पिके सध्या काढणी अवस्थेत असल्याने फळांच्या गुणवत्तेत घट होणे, खोडाला भेगा पडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शेतकऱ्यांनी काढणीस तयार झालेली फळे सकाळी किंवा संध्याकाळी सावधपणे काढावीत आणि प्रखर उन्हापासून संरक्षणासाठी फळांवर कागदी आवरणाचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नव्याने लागवड केलेल्या कलमांच्या खोडाला उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी बोडो पेस्ट लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

चिकू, नारळ आणि सुपारी पिकांवरही उष्णतेचा ताण जाणवण्याची शक्यता असून फळगळ, पाने करपणे आणि अपरिपक्व फळांची गळ होण्याचा धोका आहे. त्यामुळे पिकांना नियमित पाणी देणे, तसेच मातीतील ओलावा टिकवण्यासाठी पेंढा किंवा सेंद्रिय आच्छादन वापरण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. नवीन फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी रोपांना सावलीची व्यवस्था करून उष्णतेपासून संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालन क्षेत्रालाही या उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमान वाढल्यामुळे जनावरांच्या शरीरावर ताण येऊन दुध उत्पादनात घट होऊ शकते, तसेच कोंबड्यांच्या वाढीवर आणि अंडी उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांना स्वच्छ व थंड पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे, गोठ्यांमध्ये थंडावा राखण्यासाठी उपाययोजना करणे आणि कुक्कुटपालन शेडमध्ये योग्य हवेशीर व्यवस्था ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय, शेतमजुरांनीही दुपारच्या कडक उन्हात काम टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करावे, असा इशाराही देण्यात आला आहे. उष्णतेमुळे शरीरावर विपरीत परिणाम झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, आगामी काही दिवसांतील उष्ण व दमट हवामान लक्षात घेता शेतकरी, पशुपालक आणि शेतमजूर यांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे या विशेष कृषी सल्ल्यातून अधोरेखित करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3356077
Share This Article