GRAMIN SEARCH BANNER

विकासाची ‘कनेक्टिंग लिंक’ सुसाट, मात्र कोकणातील मुंबई गोवा महामार्ग १७ वर्षे रखडला!

Gramin Varta
39 Views

रायगड: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात मुंबई-पुणे महामार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’चे लोकार्पण करताना, या प्रकल्पाला विकासाची ‘कनेक्टिंग लिंक’ असे संबोधले. मात्र, याच वेळी विकासाच्या या गतीतून कोकण मात्र पूर्णपणे गायब असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. एकीकडे सात हजार कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अवघ्या सहा-सात वर्षात मिसिंग लिंकचे काम पूर्ण होते, पण दुसरीकडे कोकणची जीवनवाहिनी असलेला मुंबई-गोवा महामार्ग गेली १७ वर्षे रखडलेलाच आहे. यावरून सरकारने कोकणच्या जनतेला वारंवार वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्ट होत असून, आता लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवरही संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाटातील वाहतूक कोंडी कायमची संपवण्यासाठी सरकारने विशेष लक्ष देऊन हा प्रकल्प पूर्ण केला. यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचणार असला तरी, मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांच्या नशिबी मात्र अजूनही अनंत यातनाच आहेत. या महामार्गाच्या कामाला १७ वर्षे उलटूनही दरवर्षी केवळ पूर्णत्वाची पोकळ आश्वासने दिली जातात. वास्तव हे आहे की, राज्यकर्त्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या रखडलेल्या प्रकल्पाचे कोणतेही सोयरसुतक उरलेले नाही. दरवर्षी केवळ रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो, मात्र रस्ता कधीच पूर्ण होत नाही. या प्रदीर्घ दिरंगाईमुळे आतापर्यंत या महामार्गावर हजारो अपघात झाले असून शेकडो निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर हजारो लोक कायमचे जायबंदी झाले आहेत.

विशेष म्हणजे, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटनांनी वारंवार आंदोलने करूनही सरकारला जाग आलेली नाही. दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हा महामार्ग वेळेत पूर्ण होणे अशक्य असल्याचे सूचक विधान करून सरकारची हतबलता किंवा अनास्था स्पष्ट केली आहे. एका बाजूला मुंबई-पुण्याला जोडणारी ‘कनेक्टिंग लिंक’ सुसाट वेगाने धावत असताना, कोकणचा महामार्ग मात्र अद्यापही खड्ड्यांत आणि आश्वासनांत अडकून पडला आहे. सरकारने आता केवळ घोषणाबाजी न थांबवता, रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम शीघ्र गतीने पूर्ण करून कोकणासाठीही विकासाची खरी ‘कनेक्टिंग लिंक’ जोडून द्यावी, अशी मागणी आता जनसामान्यातून तीव्रपणे होत आहे. कोकणच्या विकासाचा हा ‘जाम’ कधी फुटणार, हाच प्रश्न आज प्रत्येक कोकणवासी विचारत आहे.

Total Visitor Counter

3357962
Share This Article