मुंबई-गोवा महामार्गालगत गटारापासून पाच फूट अंतरातील अतिक्रमणावर कारवाई
लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या गटाराच्या कडेला करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. गटारापासून पाच फूट अंतराच्या आत असलेली सर्व अतिक्रमणे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी जे सी बीच्या सहाय्याने कारवाई करण्यात येत आहे.
यापूर्वी या अतिक्रमण असलेल्या व्यावसायिक यांना महामार्ग विभाग यांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. या अतिक्रमनामुळे वाहनचालक व पादचारी यांना अडचणी निर्माण होत होत्या. या कारवाई दरम्यान अधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्या मध्ये बाचाबाची होऊन वातावरण तापल्याचे पाहण्यास मिळाले.
राष्टीय महामार्ग विभागाच्या वतीने व नगरपंचायत लांजा च्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत असून संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
अनेक ठिकाणी गटारालगत उभारण्यात आलेली शेड, पायऱ्या, तात्पुरती बांधकामे तसेच अन्य अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. या कारवाईमुळे महामार्गालगतची जागा मोकळी होणार असून गटार स्वच्छ व मोकळे ठेवण्यास मदत होणार आहे.
या कारवाई दरम्यान लांजा नगरपंचायत कर निर्धारक गीतांजली नाईक, स्वच्छता विभाग कर्मचारी संजय गुरव, कर विभाग लिपिक संतोष आग्रे, लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे,तसेच इतर पोलिस अधिकारी तसेच महामार्ग विभागाचे अभियंता व अधिकारी उपस्थित होते.






