GRAMIN SEARCH BANNER

पाली-खोपोली महामार्गावर भीषण अपघात; खेड येथील एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

Gramin Varta
7 Views

पाली: पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पेडली गावाच्या हद्दीत सोमवारी पहाटेच्या सुमारास कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अत्यंत भीषण अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले असून, दोन्ही वाहनांमधील धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. सोमवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार पेडली परिसरात आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कारने समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रोहन साळुंखे (रा. खेड, जि. रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य प्रवासी प्रकाश हजारे (रा. शहापूर, जि. ठाणे) आणि अविनाश पडवळ (रा. टिटवाळा) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघात एवढा भयानक होता की, जखमी प्रवासी कारच्या चक्काचूर झालेल्या भागात अडकून पडले होते. बचाव पथकाने कटरच्या साहाय्याने कारचे दरवाजे व इतर भाग तोडून अत्यंत शिताफीने जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत रोहन साळुंखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3399790
Share This Article