चिपळूण: घराबाहेर उभी केलेली नव्वद हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना चिपळूण तालुक्यातील सती चिंचघरी येथे घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सती चिंचघरी येथे राहणारे फिर्यादी रमेश गजानन चाळके (वय ५७ वर्षे, व्यवसाय शेती) यांनी आपली हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एके ४६९३) नेहमीप्रमाणे घराबाहेर रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. दिनांक १० मे २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते ८.०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी ही राखाडी (ग्रे) रंगाची दुचाकी लबाडीने चोरून नेली.
आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश चाळके यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी २० मे २०२६ रोजी दुपारी १३.११ वाजता अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १३९/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.





