रत्नागिरी : तन्वी मोरेला स्वराभिषेक शिष्यवृत्ती प्रदान

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: किराणा घराण्याचे लोकप्रिय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या भारदस्त सुरेल स्वरवर्षावात रत्नागिरीकर रसिकजन चिंब झाले. भजनीमास्तर कै. लक्ष्मण गाड स्मृति संगीत महोत्सवात झालेल्या या मैफलीचे औचित्य साधून तन्वी मोरे हिला स्वराभिषेक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

येथील स्वराभिषेक संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पं. मेवुंडी यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने ही मैफल पार पडली. यावेळी सौ. श्रुती नाईक आणि त्यांच्या शिष्यांचा भरतनाट्यम् नृत्याविष्कारानेही रसिकांची वाहवा मिळवली.

महोत्सवाच्या पहिल्या सत्रात मुंबईतील भरतनाट्यम् नर्तिका श्रुती नाईक आणि त्यांच्या शिष्या अनुष्का राठोड, पूर्वजा खापणे, परि चौधरी, जिया पिलई यांच्या अदाकारीने रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पंडित मेवुंडी यांनी मैफलीची सुरवात पूरिया धनाश्री रागातील मन मोहना या बडा ख्यालाने केली. त्याला जोडून द्रुत लयीतील ‘उठत चलत’ ही बंदिश बहारदारपणे पेश केली. झिंझोटी रागामध्ये मोहे घर नंदलाल आये ही रूपक तालातील बंदिश, तसेच ‘राधे राधे श्याम’ व ‘सावरे अईजईओ’ने रसिकांना स्वरानंदाची अनुभूती दिली. शास्त्रीय सादरीकरणानंतर अकार उकार या अभंगासोबतच काही अभंगांचे मुखडे सादर केले. भैरवी मैफलीची सांगता झाली. पं. मेवुंडी यांचा शिष्य चैतन्य परब याने त्यांना गायनसाथ केली.

कार्यक्रमासाठी हार्मोनियमसाथ दत्तराज म्हाळशी, तबलासाथ अमर मोपकर, पखवाजसाथ किशोर तेली, तालवाद्याची साथ अद्वैत मोरे, तर तानपुरासाथ चैतन्य परब, धनश्री दरडी यांनी केली. सूत्रसंचालन सौ. दीप्ती आगाशे यांनी, तर ध्वनिसंयोजन एस. कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत यांनी केले. मुख्य जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांच्या हस्ते पं. मेवुंडी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अॅड. राजशेखर मलुष्टे यांनी मनोगत व्यक्त केले.महोत्सवासाठी जयेश मंगल पार्कचे मुख्य प्रायोजकत्व, तर गौरांग आगाशे यांचे अन्बॉक्स आणि पावसचे देसाई बंधू आंबेवाले कंपनीचे आनंद देसाई यांचे सहप्रायोजकत्व लाभले.

स्वराभिषेक संस्थेतर्फे यावर्षीपासून कै. दिगंबर गाड युवा संगीत प्रतिभा शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. सातत्यपूर्ण संगीतसाधना करणाऱ्या शिष्याला ती दिली जाणार असून स्वराभिषेकची तन्वी मंगेश मोरे हिला २०२६-२७ या वर्षासाठी पहिली शिष्यवृत्ती जाहीर झाली. पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या हस्ते तन्वीला या महोत्सवात शिष्यवृत्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *