मुंबई: महाराष्ट्रातील रत्नागिरी, येरवडा (पुणे), ठाणे आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक दूरदर्शी व मानवकेंद्री पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा शासनाचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील ही चारही प्रादेशिक रुग्णालये बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवांद्वारे हजारो रुग्णांना उपचार देत असून, त्यांच्याकडे सुमारे ५७०० खाटांची मोठी क्षमता आणि व्यापक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर, आता या रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे.
हा उपक्रम केंद्र शासनाच्या मॅनपॉवर डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत ‘स्ट्रेंथनिंग पीजी डिपार्टमेंट इन मेंटल हेल्थ स्पेशालिटिज’ (स्कीम बी) या योजनेशी सुसंगत आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत (एनएमएचपी) १२व्या पंचवार्षिक योजनेपासून मानसिक आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार, आधीपासूनच पायाभूत सुविधा सज्ज असलेल्या प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे. राज्य शासनाने यापूर्वी १६ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करून एम.डी. सायकिअॅट्री, एम.फिल क्लिनिकल सायकॉलॉजी, एम.फिल सायकियाट्रिक सोशल वर्क आणि डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग या अभ्यासक्रमांना मान्यता दिली होती. हे अभ्यासक्रम ठाणे, पुणे आणि नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून एम.डी. सायकिअॅट्री अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू करण्यात आला आहे. येथे दरवर्षी ४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून, आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे व त्यापैकी २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नर्सिंग क्षेत्रातही या उपक्रमामुळे मोठी प्रगती झाली असून, ठाणे व पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये २०२२-२३ पासून डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी दरवर्षी प्रत्येकी २० विद्यार्थी प्रवेश घेत असून, आतापर्यंत ठाणे येथून ५९ आणि पुणे येथून ६० नर्सिंग विद्यार्थी यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत. या चारही प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे पूर्णतः अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर झाल्यामुळे आगामी काळात रुग्णांना अधिक विशेषज्ञ उपचार सेवा मिळतील, तसेच ग्रामीण व वंचित भागांपर्यंत गुणवत्तापूर्ण मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार होऊन शिक्षण, संशोधन आणि सामाजिक विकासाचा एक नवा टप्पा गाठला जाईल.






