पाचल / अंकुश पोटले : राजापूर तालुक्यातील करक / कारवली येथील तिठा वरती गेल्या २३ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र भाड्याच्या घरात सुरू आहे. या केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि ते अजूनही रखडलेल्या अवस्थेत आहे, ही वस्तुस्थिती संतापजनक आहे. गेली २३ वर्षे अशोक नारकर यांच्या राहत्या घरात, नादुरुस्त अवस्थेत आरोग्य केंद्र सुरू ठेवणे म्हणजे प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रदर्शनच आहे. एवढी वर्षे नादुरुस्त इमारतीत दवाखाना चालविताना आरोग्य कर्मचाऱ्यांची किती कुचंबणा होत असेल, यावरून संबंधित विभागाची कार्यक्षमता दिसून येते.
गेल्या २५ वर्षांत राज्यात पाच सरकारे आली, मात्र फक्त “निधी नाही” हे कारण पुरेसे ठरणार नाही. कामाची फाईल पुढे सरकवण्याची इच्छाशक्ती असायला हवी! राज्याच्या १३ कोटी लोकांच्या आरोग्यासाठी जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाकडून समुदाय पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही. कोरोनासारखी महामारी निघून गेली, अशा संकटाच्या वेळी पोकळ भाषणे करणारे पुढारी खूप आहेत, मात्र ग्रामीण भागात रात्री-अपरात्री गोरगरीब जनतेला देवाचीच आठवण येते. सुसज्ज व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुढे मुंबईशिवाय पर्याय उरत नाही, ही ग्रामीण भागातील आरोग्याची आजची दैन्यावस्था आहे. २५ वर्षांत रुग्णांना तपासण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नसेल तर कारवाई कोणावर करायची? फक्त अहवाल मागवणे आणि कागदी घोडे नाचवणे हेच काम झाले आहे.
कारवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या तळमजल्याचे बांधकाम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यापूर्वी किमान तळमजल्याचे बांधकाम पूर्ण होऊन आरोग्य केंद्र तिथे स्थलांतरित होईल, अशी अपेक्षा होती. या कामासाठी ७० ते ८० लाख रुपयांची तरतूद झाली असल्याची माहिती आहे, मात्र काम अर्धवट ठेवल्याने प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे पंचक्रोशीतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. नारकर यांच्या घरामध्ये सुरू असलेले हे केंद्र लवकरात लवकर नव्या इमारतीत सुरू व्हावे यासाठी स्थानिक कार्यकर्ते संबंधित विभागाकडे सतत पाठपुरावा करत आहेत. पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पांचाळ यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन हे केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नारकर यांनी दिलेल्या इमारतीला अनेक वर्षे झाल्यामुळे ती पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे. प्रशासनाने या गोष्टीचा गंभीर्याने विचार करून नवीन इमारतीचे बांधकाम वेळीच पूर्ण करून आरोग्य केंद्र तिथे स्थलांतरित करावे आणि लोकांना आरोग्य सुविधांचा लाभ द्यावा, अशी मागणी नारायण पांचाळ यांनी केली आहे.






