२५ हजार रूपये घेवून पसार ;देवरूख पोलीसांनी ५ जणांना घेतले ताब्यात; ३ जणांचा शोध सुरू
देवरूख : बुधवारी रात्री आंबा घाटमार्गे बांबावडेकडे बोलेरोतून म्हैस घेवून जाणाऱ्या चालकाला दख्खनजवळ अडवून ८ जणांनी त्याच्याकडील २५ हजार रूपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंबा घाटातील या लुटीच्या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या लुटीच्या घटनेचा देवरूख पोलीसांनी तात्काळ पर्दाफाश करत ५ जणांना ताब्यात घेतले असून ३ जणांचा शोध घेतला जात आहे.
या लुटीच्या घटनेची माहिती मिळताच लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, देवरूखचे पो. हे. काँ. सचिन कामेरकर व प्रशांत साळुंखे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व तातडीने तपासाची सुत्रे हलवत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर अजूनही तीनजण फरार असून पोलीसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल, असे पोलीसांनी सांगितले. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली.







