रत्नागिरी/ सिकंदर फरास: राज्यातून परतीच्या पावसाचा जोर काहीसा ओसरल्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पुन्हा एकदा जोरदार पावसाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठे बदल झाले असून, विशेषतः कोकण किनारपट्टी आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ३० ऑक्टोबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत उष्मा भयंकर वाढला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण असतानाच, काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत, तर काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत असल्याने शेतीचे आणि जनजीवनाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात याचा प्रभाव प्रामुख्याने जाणवेल. याच पार्श्वभूमीवर, ३० ऑक्टोबरपर्यंत या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
या संभाव्य हवामान बदलामुळे मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. समुद्रात मोठे बदल अपेक्षित असल्याने, मच्छीमारांनी समुद्रात खोलवर मासेमारीसाठी जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. किनाऱ्यावर तसेच समुद्रात खोलवर गेलेल्या मच्छीमार बांधवांनी तातडीने किनाऱ्यावर परत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.







