GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : भाटये कारची स्कूटरला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

Gramin Varta
151 Views

रत्नागिरी: पावस-रत्नागिरी रस्त्यावरील भाटये येथील हॉटेल आनंदसमोरील मार्गावर एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पावसकडून रत्नागिरीच्या दिशेने अत्यंत वेगात आणि हयगयीने येत असलेल्या एका मारुती स्विफ्ट डिझायर कारने समोरून जाणाऱ्या प्लेझर स्कूटरला चुकीच्या बाजूने  येत जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटरवरील चालक महिलेसह तिच्यासोबत मागे बसलेल्या अन्य एक महिला आणि ६ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सौ. तेजश्री अमित मोहिले (वय ४०) या १० मे २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील हिरो प्लेझर स्कूटर (क्रमांक MH 08 AE 8568) वर सौ. तीर्था चंद्रभूषण मरकर (वय ६२) आणि ६ वर्षांची चिमुरडी कु. माहिषा अमित मोहिले यांना मागे बसवून रत्नागिरी येथून कुर्ली येथील आपल्या मावशीकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कूटर भाटये येथील हॉटेल आनंदसमोरील रस्त्यावर पोहोचली.

त्याच वेळी संशयित आरोपी कार चालक अक्षय दत्ताराम वारीसे (वय ३१, रा. गोळप, गोठणेवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 05 FJ 3198) घेऊन पावसकडून रत्नागिरीकडे चालला होता. संशयिताने रस्त्याची विशिष्ट परिस्थिती आणि वाहनांची ये-जा लक्षात न घेता आपली कार अत्यंत भरधाव वेगात व अविचाराने चालवून थेट उजव्या बाजूला म्हणजेच रॉंग साईडला घेतली. यामुळे कारने समोरून येणाऱ्या तेजश्री मोहिले यांच्या स्कूटरला थेट दर्शनी भागात जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे स्कूटरवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात तेजश्री मोहिले, तीर्था मरकर आणि ६ वर्षांची माहिषा मोहिले यांना किरकोळ व गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.


अपघातानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजिस्टर क्रमांक २५/२०२६ नुसार प्राथमिक नोंद करून चौकशी सुरू करण्यात आली होती. सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार प्रमोद तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जून २०२६ रोजी दुपारी १२.५४ वाजता संशयित कार चालक अक्षय वारीसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3473317
Share This Article