लांजात हिंदू-मुस्लिम बांधवांसह पोलिस निरीक्षकांनी दाखवली माणुसकीची भावना
लांजा /अरबाज नेवरेकर : लांजा शहरातील कुंभारवाडी परिसरात महामार्गालगतच्या गटारात एक गाय अडकून पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. गटार खोल असल्याने गायीला स्वतःहून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गायीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. या घटने दरम्यान लांजा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे हे देखील गस्त घालत होते त्यांनी देखील तत्परता दाखवत नागरिकांसोबत मदतकार्य केले. सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे गायीला अखेर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
या मदतकार्यात राजू तुळसणकर, गौरव तेरवणकर, प्रसाद गुरव, लेझम मुल्ला,अजीम वनू, विनय कुंभार, गाईचे मालक वसंत कुंभार यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. गायीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आजच्या धावपळीच्या काळात धर्मभेद बाजूला ठेवून नागरिकांनी दाखवलेल्या एकोप्यामुळे लांजा शहरात सामाजिक ऐक्य आणि माणुसकीचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.
गटारात अडकलेल्या गायीला नागरिकांचे जीवदान
Leave a Comment

