रत्नागिरी : तालुक्यातील बसणी पंचक्रोशीमध्ये गेल्या काही काळापासून पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बसणी येथील एका पांडवकालीन तलावाजवळ मोठी विहीर बांधण्याचे काम दीड ते दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते.
मात्र, दुर्दैवाने गेली वर्षभर या विहिरीचे काम पूर्णपणे बंद अवस्थेत पडून होते. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आणि पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवासेनेचे रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी ठेकेदाराला धारेवर धरत तात्काळ काम करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने विहिरीचे काम सुरू केले आहे.
युवासेनेचे उपविभाग अधिकारी आराध्य महेश नेवरेकर यांनी युवासेना रत्नागिरी जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत यांच्याशी संपर्क साधला आणि समस्येची तीव्रता त्यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रसाद सावंत यांनी तात्काळ बसणी गावाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी या अर्धवट राहिलेल्या विहिरीच्या कामाची सविस्तर पाहणी केली. काम रेंगाळल्याचे पाहून त्यांनी जागेवरूनच संबंधित ठेकेदाराला फोन लावून त्याची चांगलीच कानउघडणी केली.
युवासेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर ठेकेदाराने विहिरीचे रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू केले आहे. वर्षभर बंद असलेले काम अखेर सुरू झाल्यामुळे बसणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी युवासेनेचे आणि प्रसाद सावंत यांचे आभार मानले आहेत.







