GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी एस.टी. स्टँडच्या गेटसमोरून दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
131 Views

रत्नागिरी: शहरातील मुख्य एस.टी. बस स्थानकाच्या मधल्या गेटसमोरून एक पांढऱ्या रंगाची एक्टिवा दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गाडीला चावी तशीच विसरल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याकुब सलोमन ख्रिश्चन (वय ३३, रा. खेडशी, रत्नागिरी) हे १ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त एस.टी. स्टँड परिसरात आले होते. त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची एक्टिवा दुचाकी (क्र. एम.एच. ५० बी. ३२३१) बस स्थानकाच्या मधल्या गेटसमोर उभी केली. मात्र, घाईगडबडीत त्यांच्याकडून गाडीला चावी लावलेल्या स्थितीतच राहिली. हीच संधी साधून एका अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय १० हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली.
काही वेळानंतर फिर्यादी परत आले असता त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाडी न सापडल्याने अखेर त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) (पूर्वीचे भारतीय दंड संहिता कलम ३७९) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, वर्दळीच्या बस स्थानक परिसरातून झालेल्या या चोरीमुळे वाहनचालकांनी आपल्या गाड्या सुरक्षितपणे लॉक करण्याचे आवाहन केले जात आहे.

Total Visitor Counter

3483721
Share This Article