GRAMIN SEARCH BANNER

लांजा कोत्रेवाडीतील काजू फॅक्टरीतून ९० हजारांचा माल लंपास; पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
133 Views
Masked thief caught on security cameras

लांजा: येथील कोत्रेवाडी परिसरातील झिमण कॅशु प्रोसेसिंग युनिटमधून अज्ञात चोरट्याने सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या काजू मालावर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
माऊली नगर लांजा येथील रहिवासी सुहास सुरेश झिमण (वय ४५) हे कोत्रेवाडी येथे काजू फॅक्टरी युनिट चालवतात. २८ मे रोजी सायंकाळी ६ ते २९ मे रोजी सकाळी ९.२० या कालावधीत ही चोरीची घटना घडली. चोरट्याने युनिटच्या शेडमध्ये प्रवेश करून तेथे ठेवलेला मोठ्या प्रमाणावर काजूचा माल चोरून नेला. यामध्ये समीर पंडित यांचा ४२ हजार रुपये किमतीचा अख्खा काजू, ज्यामध्ये दहा किलोच्या ३७ बॅग (३७० किलो), १७ किलो पाकळी आणि ३२ किलो तुकडा काजूचा समावेश होता. याशिवाय फिर्यादी सुहास झिमण यांचा वैयक्तिक ४८ हजार रुपये किमतीचा काजू, ज्यामध्ये दहा किलोच्या ४८ बॅग (४८० किलो) होत्या, असा एकूण ९० हजार रुपयांचा माल चोरट्याने लंपास केला आहे.

या मोठ्या चोरीप्रकरणी सुहास झिमण यांनी लांजा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ तसेच भादवि कलम ३८० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485068
Share This Article