GRAMIN SEARCH BANNER

खेड : संगलट गावातील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीस

Gramin Varta
22 Views

तातडीने कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा

खेड : तालुक्यातील संगलट मोहल्ला येथील विद्युत महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थांना अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तातडीने कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिक आधीच उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच संगलट येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण गाव अंधारात जाण्याची वेळ आली आहे. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरातील फ्रिज, एसी, मिक्सर तसेच गावातील पिठाच्या चक्क्या पूर्णपणे बंद पडल्या आहेत. याबाबत महावितरणचे शाखा अभियंता बडगुजर यांनी ग्राहकांच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली असता, केवळ १५० ते १६० व्होल्टपर्यंतच वीज मिळत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी लक्ष वेधूनही संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता उकाड्यात दिवस-रात्र काढत असताना, महावितरणचे अधिकारी मात्र एसी केबिनमध्ये बसून या समस्येकडे डोळेझाक करत असल्याच्या भावना नागरिकांमधून उमटत आहेत.

महावितरणकडून दर्जेदार सेवेच्या मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात मात्र जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणी खेड येथील कार्यकारी अभियंता बाबरेकर आणि लोटे विभागाचे उपअभियंता सचिन विलणकर यांनी स्वतः लक्ष घालून येथील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महावितरणने यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक पवित्रा संगलट येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

Total Visitor Counter

3447198
Share This Article