GRAMIN SEARCH BANNER

मंत्रालयात लागलेल्या आगीत तिरंगा वाचवणाऱ्या सुरेंद्र जाधव यांच्या हस्ते उक्षी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण

Gramin Varta
288 Views

रत्नागिरी: सन २०१२ मध्ये मुंबईतील मंत्रालय इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या वेळी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन भारताचा राष्ट्रध्वज सुरक्षितपणे खाली उतरवणारे उक्षी गावचे सुपुत्र सुरेंद्र जाधव यांच्या शौर्याचा गौरव आजही कायम आहे. या पराक्रमाची दखल घेत उक्षी ग्रामपंचायतीने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

गावातील या सुपुत्राचा सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सौ. किरण जाधव यांनी स्वतः ध्वजारोहण करण्याचा मान बाजूला सारून, तो अधिकार वीर सुपुत्र सुरेंद्र जाधव यांना बहाल केला. जाधव यांच्या हस्ते अत्यंत उत्साही वातावरणात तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. केवळ सरकारी शिष्टाचार न पाळता, ज्यांनी देशाच्या अस्मितेसाठी आपला जीव धोक्यात घातला अशा व्यक्तीला दिलेला हा सन्मान खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय मानला जात आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गावातील तरुणांसाठी ही घटना मोठी प्रेरणा देणारी ठरली आहे. या सोहळ्यामुळे कर्तव्याप्रती निष्ठा आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा राखला जातो, याचा एक उत्तम वस्तूपाठ उक्षी ग्रामपंचायतीने घालून दिला आहे.

यावेळी सरपंच किरणताई जाधव,उपसरपंच मिलिंद खानविलकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. गराटे,ग्रामविकास अधिकारी माधवी रानमळे,सहाय्यक अन्वी साळवी,मुख्याध्यापक विनायक सनगर, सौ.शेडे मॅडम, विद्यार्थी, उक्षी ग्रामस्थ उपस्थित होते.

Total Visitor Counter

3367835
Share This Article