GRAMIN SEARCH BANNER

फूणगुसच्या अर्श मुजावरची सौदी बोर्डात  ऐतिहासिक झेप; बापाचा घाम अन् आजोबांची पुण्याई ठरली यशाची शिदोरी

Gramin Varta
4 Views

संगमेश्वर / एजाज पटेल : ज्यांच्या मनगटात जिद्द आणि रक्तात धमक असते, त्यांना परकी भाषा किंवा परकं वातावरण कधीच रोखू शकत नाही, याचा जिवंत पुरावा फूणगुसच्या सुपुत्राने दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील फूणगुसचा सुपुत्र अर्श बासित मुजावर याने सौदी अरेबियातील रधवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये १० वीच्या परीक्षेत तब्बल ९३ टक्के गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. हे केवळ यश नसून सौदीच्या भूमीवर उमटलेली फूणगुसच्या स्वाभिमानाची आणि बुद्धिमत्तेची जबरदस्त मोहोर आहे. या ऐतिहासिक यशाच्या मुळाशी मुजावर कुटुंबाचा पिढ्यानपिढ्या जपेलेला संस्कारांचा अनमोल ठेवा आहे. अर्शचे आजोबा आणि फूणगुस येथील प्रसिद्ध हजरत शेख जाहीर शेख पीर दर्ग्याचे व्यवस्थापक स्व. नासिरभाई मुजावर यांनी आयुष्यभर सचोटी, सेवा आणि निष्ठेचा जो आदर्श घालून दिला, त्याचेच तेजस्वी प्रतिबिंब आज अर्शच्या रूपाने पाहायला मिळत आहे. घराण्यातील नैतिक मूल्यांमुळे आणि शिस्तीच्या वातावरणामुळे अर्शने परदेशात असूनही आपल्या मातीची संस्कृती आणि शिक्षणाची ओढ कधीच कमी होऊ दिली नाही.

या विजयाचा खरा शिल्पकार अर्शचे वडील बासित मुजावर हे आहेत. बासित मुजावर हे स्वतः उच्चशिक्षित असून, ज्या रत्नागिरीच्या नामांकित महाविद्यालयात त्यांनी आपल्या शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली, त्याच ज्ञानाची मशाल त्यांनी आपल्या मुलाच्या मनात पेटवली. आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातासमुद्रापार स्वतःला झोकून देणाऱ्या या पित्याने मुलाच्या प्रत्येक यशासाठी अहोरात्र कष्ट घेतले. वडिलांच्या मार्गदर्शनाचा अर्शने आज पूर्ण सन्मान राखला असून त्याने मिळवलेले गुण ही त्याच्या वडिलांनी परदेशात सोसलेल्या कष्टांना दिलेली सर्वात मोठी सलामी ठरली आहे. कोकणच्या मातीत जन्मलेला आणि चिपळूणमध्ये शिक्षणाचे बाळकडू घेतलेला अर्श जेव्हा सौदी अरेबियात गेला, तेव्हा तिथली भाषा आणि संस्कृती पूर्णतः निराळी होती. मात्र, पाठीशी आजोबांचे आशीर्वाद आणि वडिलांच्या कष्टांची जाणीव असल्याने अर्शने तिथल्या बोर्डाला फूणगुसच्या मातीतील बुद्धीची आक्रमक ताकद दाखवून दिली.

यशानंतर अर्शने अत्यंत भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली असून आज ९३ टक्क्यांचा डोंगर सर केला असला तरी आजोबांच्या नसण्याची खंत मनाला चरे पाडत असल्याचे त्याने म्हटले आहे. आज जर आजोबा असते, तर त्यांनी मायेने पाठीवर ठेवलेला हात जगातील कोणत्याही पदवीपेक्षा मोठा असता, अशी भावना त्याने व्यक्त केली. वडील बासित मुजावर यांनी परदेशात राहून गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे चीज करायचे होते आणि हे यश मुजावर घराण्याच्या संस्कारांना अर्पण असल्याचे अर्शने नमूद केले. अर्शच्या या यशाने फूणगुस गाव केवळ आनंदित नाही, तर अभिमानाने भरून आले आहे. अर्शने हे सिद्ध केले आहे की, घराण्याचे संस्कार भक्कम असतील आणि वडिलांची साथ खंबीर असेल, तर कोकणातला मुलगा जगाच्या पाठीवर कुठेही आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरू शकतो.

अर्शचे चुलत आजोबा नूर मोहमद मुजावर यांनीही आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, अर्शने सातासमुद्रापार फूणगुसचे नाव पुन्हा एकदा जिवंत केले आहे. मुजावर घराण्याने नेहमीच कष्टाला आणि इमानदारीला महत्त्व दिले असून आज अर्शने त्याच संस्कारांचे सोने केले आहे. बासितने रत्नागिरीत शिक्षण घेऊन जे स्वप्न पाहिले होते, ते आज त्याच्या मुलाने पूर्ण केले. आज नासिरभाईंची उणीव प्रकर्षाने भासतेय, कारण नातवाचा असा पराक्रम पाहताना आजोबांना होणारा आनंद शब्दांच्या पलीकडचा असतो. नासिरभाईंनी दर्ग्याच्या सेवेतून जो पुण्याईचा ठेवा निर्माण केला, त्याच पुण्याईच्या बळावर अर्शने हे यश मिळवले आहे. अर्श मुजावर हा केवळ मुजावर कुटुंबाचाच नाही, तर संपूर्ण फूणगुसच्या मातीचा मानबिंदू ठरला असून त्याने परक्या मुलखात फूणगुसच्या संस्कारांचा बुलंद आवाज पोहोचवला आहे.

Total Visitor Counter

3305691
Share This Article