GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या आज्ञा शिंदेची ऐतिहासिक कामगिरी; विभागीय जलतरण स्पर्धेत पाच सुवर्णपदकांवर कोरले नाव

रत्नागिरी : चिपळूण येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या साडेआठ वर्षीय जलतरणपटू आज्ञा नयनेश शिंदे हिने पाच सुवर्णपदके जिंकून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तिने ‘चॅम्पियनशिप ट्रॉफी’ देखील पटकावली, ज्यामुळे तिच्या या यशाला आणखी गौरव प्राप्त झाला आहे.

जिल्हा जलतरण असोसिएशनच्या मान्यतेने चिपळूणच्या रामतीर्थ जलतरण तलावावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कराड आणि सांगली येथील अनेक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. यातील ९ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात सहभागी झालेल्या आज्ञाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले.

आज्ञाने ५० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर फ्रीस्टाइल आणि १०० मीटर वैयक्तिक मेडल (आय.एम.) या पाचही प्रकारांमध्ये सुवर्णपदके मिळवली. तिच्या या अतुलनीय कामगिरीमुळे तिला स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी प्रतिष्ठेची ‘चॅम्पियन ट्रॉफी’ देखील प्रदान करण्यात आली.

गेल्या वर्षभरापासून आज्ञा रत्नागिरी क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावावर ‘अ‍ॅक्वा टेक्निक्स स्विमिंग क्लब’मध्ये राष्ट्रीय जलतरण संस्थेचे प्रशिक्षक विवेक विलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहे. तिने आपल्या या देदिप्यमान यशाचे श्रेय प्रशिक्षक, आई-वडील आणि शिंदे कुटुंबियांना दिले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्ह्यासह सर्वच स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

2474950
Share This Article