GRAMIN SEARCH BANNER

राजापूर तालुक्यात पुन्हा दुचाकी चोरीचे सत्र; एका रात्री चार दुचाकी व मोबाईल लंपास

Gramin Varta
378 Views

राजापूर : तालुक्यात पुन्हा एकदा दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री एकाच वेळी चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात वैभव देवू करंबे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले, शिवणे बुद्रुक येथील रहिवासी वैभव करंबे यांनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी आपली दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एएच ५४६४) घरापासून काही अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यालगतच्या शेडमध्ये उभी केली होती. मात्र, शनिवारी २० डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कामावर जाण्यासाठी ते गाडीजवळ गेले असता दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर परिसरात शोध घेतला असता, करंबे यांच्या दुचाकीसह गावातील सुतारवाडी येथील सतीश पांचाळ यांची दुचाकी (एमएच ०८ एव्ही ०९३५), वडदहसोळ बौद्धवाडी येथील अविनाश गोविंद जाधव यांची दुचाकी (एमएच ०४ सीआर ४१८७) तसेच कोंडदसूर बांधवाडी येथून आणखी एक दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. याच रात्री दसूर येथील कालसेकर यांचा मोबाईलही चोरीला गेल्याची माहिती आहे.

चोरट्यांनी चार दुचाकी व एक मोबाईल असा सुमारे ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3369882
Share This Article