मंडणगड: राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाच्या मागील ८ वर्षांपासून सुरू असलेल्या संथ आणि अर्धवट कामामुळे मंडणगड तालुक्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी, २ जून रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई सडे मार्गे मंडणगड या एसटी बसला शेनाळे गावाच्या हद्दीत असाच एक भीषण अपघात घडला. सुदैवाने या अपघातात बसमधील सर्व १८ प्रवासी बालंबाल बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
मुंबई सेंट्रल येथून रात्री १२ वाजता सुटलेली मुंबई आगाराची ही नियमित बस सडे गावाच्या आधी असलेल्या शेनाळे येथे आली असता, अचानक रस्ता सोडून दरीकडील बाजूस कलंडली. रस्त्यावर पसरलेल्या खडी आणि रेतीमुळे चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शेनाळे गावाचे विश्वनाथ सावंत, सुनील साळवी, विकी कदम, विवेक वाडकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या ग्रामस्थांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून त्यांना मदतीचा हात दिला आणि पुढील प्रवासासाठी रिक्षांची व्यवस्था करून दिली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ठिकठिकाणी खडी, वाळू आदी साहित्य रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले आहे. हे खडी सदृश साहित्य आता रस्त्यावर पसरले असून, रात्रीच्या अंधारात किंवा पहाटेच्या अंधुक प्रकाशात वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. महामार्गाच्या या बेजबाबदार आणि रखडलेल्या कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.







