GRAMIN SEARCH BANNER

लांजा येथे टेम्पोची मोटारसायकलला धडक; दोन तरुण जखमी, अपघातानंतर चालक फरार

Gramin Varta
22 Views

लांजा: लांजा ते दाभोळे मार्गावर आसगे पुलाजवळ एका भरधाव टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, अपघातानंतर चालक माहिती न देताच टेम्पोसह घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी विनेश विजय पवार (रा. आसगे) हा आपल्या ताब्यातील इंट्रा टेम्पो (क्रमांक एमएच ०८ एपी ७४२४) घेऊन लांजाकडून आसगेच्या दिशेने जात होता. आसगे पुलाच्या अलीकडे असलेल्या कदम कृषी परिवार फलकाजवळ पोहोचल्यावर, चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पो हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवला. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला (क्रमांक एमएच ०८ पी ३०९६) टेम्पोने चुकीच्या बाजूला जाऊन जोरात धडक दिली.

या धडकेत मोटारसायकलवरील स्वार साहिल संतोष वाघाटे (२३) आणि सौरभ संतोष वाघाटे (२४, दोन्ही रा. लांजा वैभव वसाहत) हे दोघेही खाली कोसळून जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना खबर देण्याऐवजी चालक विनेश पवार तिथून निघून गेला. लांजा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार उर्मिला शेडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3386203
Share This Article