GRAMIN SEARCH BANNER

शिरगाव येथे मठामागे आढळला ५४ वर्षीय प्रौढाचा मृतदेह

Gramin Varta
109 Views
A shot in the morgue

चिपळूण : तालुक्यातील शिरगाव येथील शिगवण मठाच्या पाठीमागील परिसरात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश राजाराम यादव (वय ५४, रा. अलोरे देऊळवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांचा मृतदेह ३ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील शिगवण मठाच्या पाठीमागील परिसरात उपड्या अवस्थेत आढळून आला.

मयत महेश यादव हे दारूच्या अतिव्यसनाधीन असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ते अनेकदा विविध ठिकाणी वास्तव्यास राहत असत तसेच अधूनमधून आपल्या मूळ गावी अलोरे देऊळवाडी येथे ये-जा करत असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, शिरगाव पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईक प्रमोद राजाराम यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली असता तो महेश यादव यांचाच असल्याची खात्री झाली.

या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू क्रमांक १३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3471858
Share This Article