रत्नागिरी: जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या फिट इंडिया मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या संडे ऑन सायकल अभियानाला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रविवारी सकाळी मारुती मंदिर ते सायकल ट्रॅक व परत मारुती मंदिर या मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. १०० हून अधिक लहान मुले, महिला, पुरुषांनी यात भाग घेतला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, इंडियन कोस्टगार्ड एअर स्टेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते.
या उपक्रमामध्ये सायकलिंगद्वारे नागरिकांना तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. या अभियानाची सुरवात मारुती मंदिर येथून झेंडा दाखवून करण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिर सर्कल, सायकल ट्रॅक रोड, नूतननगर, अभ्युदयनगर, पॉवर हाऊसमार्गे मारुती मंदिर सर्कल या मार्गावर ५ किमी अंतराचे सायकलिंग करण्यात आले.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमधील बालदोस्तांसह, महिला, ज्येष्ठ आणि नियमित सायकल चालवणाऱ्या सायकलिस्टनी या रॅलीत आनंदाने सहभाग घेऊन रॅली यशस्वी केली. सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित करणे, पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सायकलिंग हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, असा संदेश या वेळी देण्यात आला.

