दापोली: पर्यावरण आणि प्राणिशास्त्र संशोधन क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने झळकले आहे. दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजमधील प्राणिशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. नंदा भूपाल जगताप यांच्या एका अभिनव संशोधनाची केंद्र सरकारने थेट दखल घेतली असून, त्यांनी विकसित केलेल्या विशेष सुरक्षा उपकरणाला अधिकृत राष्ट्रीय डिझाईन पेटंट (Design Patent) बहाल केले आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने या उपकरणाची अधिकृत नोंदणी करून त्याचा समावेश ४९५३०८-००१_JOURNAL.pdf या शासकीय दस्तऐवजात केला आहे.
वन्यजीव आणि पक्षी संरक्षणाच्या दृष्टीने प्रा. डॉ. नंदा जगताप आणि त्यांच्या चमूने विकसित केलेले हे ’सर्व्हिलन्स डिव्हाइस फॉर नेस्ट प्रोटेक्शन’ (Surveillance Device for Nest Protection) म्हणजेच ‘घरटे संरक्षणासाठी पाळत ठेवणारे उपकरण’ अत्यंत क्रांतीकारक पाऊल मानले जात आहे. निसर्गातील दुर्मिळ पक्ष्यांची घरटी, त्यांची अंडी आणि वन्यजीवांवर बारीक नजर ठेवण्यासाठी तसेच त्यांचे हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी हे उपकरण मैलाचा दगड ठरेल. विशेष म्हणजे सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालणारे हे उपकरण जंगलासारख्या अत्यंत दुर्गम भागातही कोणत्याही वीजपुरवठ्याशिवाय अविरतपणे काम करण्यास सक्षम आहे. या ऐतिहासिक यशामुळे दापोली अर्बन बँक कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण कोकणच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातून डॉ. जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या संयुक्त संशोधनामध्ये डॉ. नंदा जगताप यांच्यासह अलाहाबाद विद्यापीठातील डॉ. अमिताभ शाद, छत्तीसगडचे संशोधक निशांत घोडे आणि मेरठ येथील डॉ. संगीता शर्मा या देशातील नामवंत संशोधकांचा मोलाचा सहभाग आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. नंदा जगताप यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांचे विशेष आभार मानले असून, प्राचार्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मोलाचे प्रोत्साहन आणि संशोधनासाठी लागणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधा कॉलेजमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळेच हा टप्पा गाठणे शक्य झाल्याचे सांगितले. त्याचसोबत संशोधनाला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या ’दापोली एज्युकेशन सोसायटी’ने दिलेल्या खंबीर पाठबळामुळे आणि कॉलेजमधील पोषक वातावरणामुळे या राष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाला गती मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. दापोलीला मिळालेल्या या सर्वोच्च बहुमानाबद्दल दापोली एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. नंदा जगताप यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
