रत्नागिरी: ‘गोळप कट्टा’च्या ७८ व्या कार्यक्रमात रत्नागिरीतील सुप्रसिद्ध तबला वादक आणि तबला अलंकार श्री. केदार लिंगायत यांची सविस्तर मुलाखत पार पडली. अविनाश काळे यांनी घेतलेल्या या मुलाखतीतून केदार लिंगायत यांचा पांगरी ते रत्नागिरी असा सांगीतिक प्रवास आणि त्यांनी संगीतासाठी दिलेले योगदान उलगडत गेले. वडिलांच्या पखवाज वादनाच्या वारशातून संगीताची आवड निर्माण झालेल्या लिंगायत यांनी, दैनिकातील नोकरी सोडून पूर्णवेळ तबला साधनेचा घेतलेला निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
पांगरीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या केदार लिंगायत यांनी विनायकबुवा रानडे, हेरंब जोगळेकर, प्रसाद करंबेळकर आणि पं. आमोद दंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. संगीत नाटकांसह अनेक राष्ट्रीय कीर्तनकार आणि शास्त्रीय गायकांना साथ देत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः ‘स्वरसम्राज्ञी’ नाटकातील उत्कृष्ट वादनासाठी त्यांना रौप्यपदक देऊन गौरवण्यात आले आहे.
केवळ स्वतःची कला जोपासली नाही, तर २०१३ मध्ये कुवारबाव येथे सुरू केलेल्या क्लासच्या माध्यमातून आज ते सुमारे २०० विद्यार्थ्यांना तबल्याचे धडे देत आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे आज रत्नागिरीत अनेक तरुण वादक तयार होत असून, त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी तबला विशारद आणि अलंकार पदव्या प्राप्त केल्या आहेत.
कार्यक्रमादरम्यान लिंगायत यांनी वादनातील रियाज आणि साऊंड सिस्टीमचे महत्त्व विषद केले. “आपल्यापेक्षा आपले शिष्य मोठे व्हावेत, हीच गुरुची खरी इच्छा असते,” असे सांगत त्यांनी नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संयम आणि सातत्याचा सल्ला दिला. तसेच ‘नादब्रम्ह’ कार्यक्रमाची संकल्पना आणि विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या आरती मंडळाच्या विक्रमी कामगिरीचाही त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. मुलाखतीच्या उत्तरार्धात त्यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. शेवटी संतोष गोडबोले यांच्या हस्ते केदार लिंगायत यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे रत्नागिरीतील सांगीतिक वातावरणाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली असून, रसिकांकडून या मुलाखतीचे मोठे कौतुक होत आहे.
