ब्रेकिंग : खेडशी येथे डंपरचा दुचाकीला भीषण धडक; महिला जागीच ठार

Gramin Varta
1647 Views

रत्नागिरी: हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर खेडशी येथे सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेनंतर डंपर थेट दहा फूट खोल दरीत कोसळला. या घटनेत डंपरखाली सापडल्याने जाकादेवी खालगाव येथील पांचाळ कुटुंबातील संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दुचाकीवरून जात असताना खेडशी येथे या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील महिला डंपरच्या चाकाखाली चिरडली गेली. नियंत्रण सुटल्यामुळे डंपर महामार्गावरून खालील बाजूस दहा फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळला. या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे, याच ठिकाणी थोड्या वेळापूर्वी रिक्षाचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या परिसरातील रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *