रत्नागिरी: कुवारबाव येथे शॉर्ट सर्किटमुळे तीन दुकाने आगीच्या भक्षस्थानी; लाखो रुपयांचे नुकसान

Gramin Varta
441 Views

रत्नागिरी :  कुवारबाव परिसरातील गणेश कॉलनी येथे रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीच्या भक्षस्थानी नारायण कृष्णा चव्हाण यांचे फर्निचरचे दुकान, गणेश सुरेश सागवेकर यांचे मोटारसायकल गॅरेज आणि संकेत चंद्रकांत भुते यांचे महा-ई-सेवा केंद्र आले आहे. रविवारी रात्री शॉर्ट सर्किट झाल्याने सुरू झालेली ही आग काही क्षणांतच रौद्र रूप धारण करून तिन्ही दुकानांपर्यंत पसरली.

आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, दुकानातील फर्निचर, दुचाकी दुरुस्तीचे महागडे साहित्य, संगणक संच, महत्त्वाचे दस्तऐवज आणि इतर मौल्यवान वस्तू क्षणात भस्मसात झाल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने सर्व काही वेढल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही एक दिलासादायक बाब आहे. तरीही, आपल्या हाता-तोंडाशी आलेला व्यवसाय आणि लाखो रुपयांची मालमत्ता डोळ्यादेखत खाक झाल्याने संबंधित व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी नुकसानीचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *