पुणे दारूकांड: आरोपींवर ‘मकोका’ची टांगती तलवार; मृतांच्या नातेवाहांना सात दिवसांत मिळणार आर्थिक मदत – योगेश कदम

Gramin Varta
87 Views

मुंबई: पुण्यातील दापोडी-हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारूकांड प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून, या दुर्घटनेत २२ जणांचा बळी गेला आहे. या भीषण घटनेची गंभीर दखल घेत, यातील मुख्य आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.

या प्रकरणी मृत झालेल्या सर्व २२ जणांच्या कुटुंबीयांना पुढील सात दिवसांच्या आत तातडीची आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आतापर्यंत केवळ नऊ कुटुंबीयांना मदत मिळाली होती, मात्र आता उर्वरित बाधितांनाही त्वरित मदत मिळवून दिली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

विधान परिषदेत या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. बोगस ओळखपत्रांचा वापर करून भिवंडीतून २१५ लिटर मिथेनॉल पुण्यात आणले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

दारूकांडप्रकरणी स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक जबाबदार अधिकाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल आहेत. हा केवळ अपघात नसून संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे निष्पन्न होत असल्याने, मुख्य सूत्रधारांवर ‘मकोका’ लावण्याबाबतचा कायदेशीर अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबतच शासकीय नोकरी देण्याची मागणीही सदस्यांकडून लावून धरण्यात आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *