ब्रेकिंग: नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा; कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Gramin Varta
904 Views

पुणे : ग्रामीण भागातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानवी घटनेतील दोषी भीमराव कांबळे (वय ६५) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आज २९ जून रोजी हा ऐतिहासिक निकाल दिला. अवघ्या काही दिवसांत तपास पूर्ण करून आणि जलदगतीने खटला चालवून हा निकाल देण्यात आला असून, न्यायालयाने हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (रेअरेस्ट ऑफ द रेअर) असल्याचे नमूद केले आहे.

गेल्या १ मे रोजी नसरापूरमधून साडेतीन वर्षांची चिमुरडी बेपत्ता झाली होती आणि त्यानंतर काही वेळातच तिचा मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्र फिरवले. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यकीय पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित भीमराव कांबळे याला ताब्यात घेतले होते. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पोलिसांनी तब्बल १२ वे पानांचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक पद्धतीने घेण्यात आली.

२५ जून रोजी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. आपल्या निरीक्षणात न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपीने अतिशय थंड डोक्याने हे क्रूर कृत्य केले आहे आणि त्याला गुन्ह्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. तसेच, आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेला असल्याने त्याला फाशीची शिक्षा देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सरकारी वकिलांनी या प्रकरणाशी साधर्म्य असलेली १२ प्रकरणे आणि त्यातील आरोपींना झालेली फाशीची शिक्षा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. आरोपी भीमराव कांबळे याच्यावर एका महिलेवर हल्ला केल्याचाही आरोप आहे. अखेर, पीडित चिमुरडीला न्याय मिळाला असून, या निकालाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *