चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ
रत्नागिरी: कुवारबाव येथे शहराच्या दिशेने येणाऱ्या तीव्र उतारावर सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली. रेल्वे स्टेशनकडून खाली येत असलेल्या एका ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. मात्र, ट्रक चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे रस्त्यावरील अनेक वाहने आणि प्रवाशांचे प्राण वाचले असून एक मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी संबंधित ट्रक रेल्वे स्टेशनकडून कामाच्या निमित्ताने शहराच्या दिशेने येत होता. कुवारबावचा हा रस्ता तीव्र उताराचा आणि वळणाचा म्हणून ओळखला जातो. ट्रक उतारावरून खाली येत असतानाच अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाची चांगलीच तारांबळ उडाली आणि त्याचा ट्रकवरील ताबा सुटू लागला.
त्यावेळी त्या तीव्र उतारावर ट्रकच्या समोर अनेक लहान-मोठी वाहने आणि पादचारी जात होते. वेग घेतलेला ट्रक जर समोरच्या वाहनांवर आदळला असता, तर मोठी साखळी दुर्घटना होऊन मोठा जिवितहानी झाली असती मात्र, अशा कठीण प्रसंगातही ट्रक चालकाने प्रसंगावधान राखले. समोरच्या वाहनांना धडक बसू नये आणि निरपराध लोकांचे प्राण वाचावेत, यासाठी चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा धाडसी निर्णय घेतला.
चालकाने समोरच्या गाड्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत वळवला. अचानक लावलेल्या या वळणामुळे वेगात असलेला ट्रक रस्त्याशेजारील बाजूला जाऊन थेट कलंडला. हा अपघात इतका भीषण होता की यात ट्रकच्या समोरील भागाचे आणि इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि इतर वाहनधारकांनी तातडीने ट्रकच्या दिशेने धाव घेतली. सुदैवाने, या अपघातात ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. चालकाने दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे रस्त्यावरील इतर सर्व वाहने आणि त्यातील प्रवासी बालंबाल वाचले. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या ट्रक चालकाचे रत्नागिरीकरांकडून आणि सोशल मीडियावर सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.
