रत्नागिरी: मांडवी एक्सप्रेसच्या तीन एसी डब्यांचा वीजपुरवठा खंडित; प्रवाशांचे २० मिनिटे हाल

Gramin Varta
201 Views

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. खेड रेल्वे स्थानकापासून या गाडीतील तीन एसी डब्यांचा वातानुकूलित यंत्रणा (एसी) अचानक बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरला. हे डबे वातानुकूलित असल्याने खिडक्या उघडण्याची कोणतीही सोय नव्हती, त्यातच मार्गावरील बोगद्यांमुळे डब्यातील हवा खेळती राहण्यासही अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुमारे २० मिनिटांच्या कालावधीनंतर रत्नागिरी स्थानकावर पोहोचल्यावर ही यंत्रणा पुन्हा सुरू झाली, तोपर्यंत प्रवाशांना असह्य उकाडा आणि कोंदट वातावरणाचा सामना करावा लागला.

मांडवी एक्सप्रेस आधीच एक तास उशिराने धावत असतानाच, त्यात भर म्हणून एसी बंद पडल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. अतिरिक्त पैसे भरूनही रेल्वे प्रशासनाकडून दर्जेदार सुविधा मिळत नसल्याची तीव्र नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस ही कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा मानली जाते. मात्र, अशा प्रकारच्या तांत्रिक अपयशामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सोयीसुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त प्रवाशांकडून केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *