मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वासाठी कोकणवासीयांना अजून दोन वर्षे प्रतीक्षा; गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल कायम

Gramin Varta
286 Views

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी कोकणवासीयांना आणखी किमान दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देताना ही कबुली दिली आहे. गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने, यंदाच्या गणेशोत्सवातही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात गैरसोयीचे सावट कायम राहणार आहे.

महामार्गावरील माणगाव वळणरस्ता, चिपळूण उड्डाणपूल आणि संगमेश्वर उड्डाणपूल या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांमधील विलंब महामार्ग पूर्णत्वास जाण्यात मुख्य अडथळा ठरत आहे. माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तेथील एसटी डेपो शहराबाहेर स्थलांतरित करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मुंबई कोस्टल रोड यांसारखे राज्यातील अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होऊनही मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, ही मुदतही हुकल्याने कोकणवासीयांच्या संयमाचा अंत झाला आहे. कामात विलंब होण्यामागे मजूर आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण समोर आले आहे. या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात देवधे-वेरळदरम्यान दरड कोसळल्याची घटना घडल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *