दापोली: आंजर्लेच्या लेकीची भरारी; भारतीय महसूल सेवेतील अधिकारी प्रशिक्षणार्थी आयशा काझी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Gramin Varta
363 Views

दापोली: दापोली तालुक्यातील आंजर्ले गावच्या सुकन्या आयशा इब्राहिम काझी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत भारतीय महसूल सेवेमध्ये (IRS) स्थान मिळविले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत नुकतीच राष्ट्रपती भवनात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. मूळच्या आंजर्ले येथील जुईकर मोहल्ल्यातील रहिवासी असलेल्या आयशा काझी सध्या ठाणे जिल्ह्यातील काळवा-मुंब्रा येथे वास्तव्यास आहेत. २०२३ च्या कठीण अशा यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत त्यांनी आयआरएस अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

सध्या त्या अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असून, राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रतिष्ठित प्रतिनिधीमंडळाच्या सदस्या म्हणून त्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान कोकणवासीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. आयशा यांच्या या यशामुळे आंजर्ले गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, ग्रामीण भागातील मुलांसाठी त्यांचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Visitors :
4827217
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *